जालना- मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले उपोषण आज सोडले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते सातव्यांदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारचे कुणीही प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आला नाही. भाजपा आमदार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुठलेही ठोस आश्वासन न मिळताच जरांगेंनी हेही उपोषण सोडले.
काल जरांगे यांची प्रकृती खाल्यावल्यानंतर अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांशी चर्चा करून उपोषण सोडणार असे त्यांनी जाहीर केले होते. आज सुरेश धस अंतरवाली सराटीत आल्यावर जरांगे यांनी, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडे गॅझेट आहेत. तिन्ही गॅझेट आहेत. ती कधी लागू करणार, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर सुरेश धस यांनी लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मुंबईला धडकणार, असा इशारा त्यांनी दिला. उपोषण संपल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, हे आंदोलन स्थगित करत आहोत. यापुढे उपोषण होणार नाही. आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची आहे. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तरुणांच्या वारसदारांना नोकरी द्या. वंशावळ समिती पुन्हा गठीत करा. नोंदी शोधणाऱ्या शिंदे समितीचे काम लगेच सुरू करा. या समितीने काम करताना अधिकाऱ्यांनी किचकट अटी घालू नयेत. तसे करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करा. आमच्याकडे असलेल्या अभ्यासकांना नोंदी शोधण्यासाठी संधी द्या. सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट आणि औंध संस्थानाचे पुरावे घ्या. ह्या आमच्या मागण्या आहेत, त्या मान्य करा. त्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही मुंबईला धडक देणार आहोत.