श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमधील सुरणकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ७५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
बुखारी यांनी फेब्रुवारीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.याआधी ते नॅशनल कॉन्फरन्समध्ये होते.बुखारी पुंछ जिल्ह्यातील सुरनकोटमधून दोन वेळा आमदार राहिले आहेत.ते एकेकाळी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या जवळचे मानले जायचे.पहाडी समुदायाला एसटीचा दर्जा देण्यावरून फारुख अब्दुल्ला यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये पक्षासोबतचा चार दशकांचा संबंध तोडला होता.