मुंबई – कोकण रेल्वेच्या मुंबईकडे येणाऱ्या तीन गाड्यांचे थांबे सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरण कामामुळे बदलण्यात आले आहेत. त्यामुळे २८ फेब्रुवारी पर्यंत जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस या दोन गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादरपर्यंत आणि मंगळुरु एक्स्प्रेस ही गाडी ठाण्यापर्यंत धावणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील १२ आणि १३ क्रमांकाच्या फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाणार होते.मात्र हे विस्तारीकरणाचे काम रखडल्याने ही मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी,तेजस आणि मंगळुरु एक्स्प्रेस या गाड्या आता सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादर स्थानकापर्यंतच धावत आहेत. कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार,मंगळुरु ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (१२१३४) ही गाडी ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे.मडगाव जंक्शन ते सीएसएमटी तेजस (२२१२०) आणि मडगाव जंक्शन ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५२) या गाड्या येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत.