ठाणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदीर उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील हे दुसरे मंदिर आहे. या मंदिराचे लोकार्पण १७ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त शुक्रवार १४ मार्चपासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त डॉ. राजू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य मंदीर उभारण्यात आले आहे. गडकिल्ल्यांच्या धर्तीवर, देशातील विविध मंदिराच्या शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदीराचे क्षेत्रफळ अडीच हजार चौरस फूट असून, तटबंदी पाच हजार चौरस फूट इतकी आहे. हे मंदीर चार एकर जमिनीवर विस्तारले आहे. या मंदीरामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल, तसेच भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.