बीजिंग- चीनमध्ये लवकरच बुलेट ट्रेनपेक्षा वेगवान ट्रेन धावणार आहे. या नव्या अतिवेगवान रेल्वे गाडीची झलक रविवारी चीनने जगाला दाखवली. सीआर 450 इएमयू असे या नव्या मॉडेलचे नाव आहे. या गाडीचा वेग ताशी 400 किलोमीटर आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात वेगवान रेल्वे गाडी ठरणार आहे. सध्या चीनमध्ये धावत असलेल्या जगातील सर्वात वेगवान सीआर 400 फक्सिंग या गाडीचा वेग ताशी 350 किलोमीटर आहे. आता रेल्वेने वेगाचा पुढचा टप्पा गाठला आहे.
चायना स्टेट रेल्वे ग्रुप कंपनीने (चायना रेल्वे) या अतिवेगवान गाडीबद्दल माहिती दिली. त्यानुसार सीआर-450 इएमयू या गाडीचा कमाल वेग ताशी 450 किलोमीटर आहे. चाचणीदरम्यान गाडीने कमाल वेग गाठला होता. मात्र या गाडीचे व्यावसायिक परिचालन करताना ती ताशी 400 किलोमीटर वेगाने धावणार आहे.
ही गाडी जगातील सर्वात वेगवान ठरणार आहेच, पण त्यात प्रवाशांची सुरक्षा आणि अत्यंत उत्कृष्ट सोयी-सुविधा देण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या प्रचंड वेगातही प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येईल.
गाडीच्या निर्मितीसाठी प्रत्येक टप्प्यावर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विशेषतः प्रवाशांच्या सुरक्षेला प्राथमिकता देत गाडीच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे की, एवढ्या वेगातही आणीबाणी वेळी गाडीला ब्रेक लावावा लागला तरी गाडी रुळावरून उतरणार नाही. गाडीच्या निर्मितीत कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे गाडीचे वजन तुलनेने कमी आहे. वॉटर कुल्ड सिस्टीम, पर्मनंट मॅग्नेट ट्रॅक्शन आणि हाय स्टॅबिलिटी बोगी सिस्टीम यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर गाडीच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि आरामदायक प्रवासाठी करण्यात आला आहे.
गाडीला आठ डबे आहेत. या डब्यांमध्ये अन्य हायस्पीड रेल्वे गाड्यांच्या तुलनेने दोन आसनांमध्ये अंतर जास्त ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर गाडीमध्ये साऊंडप्रूफ यंत्रणा बसविण्यात आली आहे. डब्यांमध्ये सायकल आणि व्हिलचेअरसाठी स्वतंत्र कक्ष देण्यात आला आहे.
चीनकडे जगातील सर्वात मोठे 47 हजार किलोमीटरचे हायस्पीड रेल्वेचे नेटवर्क आहे. या नेटवर्कचा जास्तीत जास्त वापर या नव्या रेल्वे गाडीसाठी करण्यात येणार आहे. पुढील वर्षी ही रेल्वे सेवा सुरू होणे अपेक्षित आहे. चीनमध्ये असलेल्या वेगवान रेल्वे या अजून नफ्यात आल्या नसल्या तरी या रेल्वेमुळे दळणवळण सुधारल्याने इतर बाबतीत या वेगवान रेल्वे फायदेशीर ठरत आहेत.