चीनचा नवा आजार भारतात पोहोचला! 3 रुग्ण आढळले! विमानतळावर तपास करा

मुंबई – चीनमध्ये पसरत चाललेला नवा आजार भारतात दाखल झाला आहे. त्याचे 3 रुग्ण भारतात आढळले आहेत. महाराष्ट्रात सरकारने मास्क घाला, हस्तांदोलन करू नका, असे सांगितले असले तरी विमानतळावर त्वरित तपासणी सुरू केली पाहिजे. कोरोना आल्याचे प्रथम केरळ राज्याला कळले होते. कारण केरळचे अनेक विद्यार्थी चीनला शिक्षणासाठी जातात. त्यामुळे केरळ सरकारने त्वरित विमानतळावर तपासणी सुरू केली. मात्र भारतात इतर विमानतळावर हे बंधनकारक न केल्याने चीनहून येणारे तपासणी टाळण्यासाठी इतर राज्यातील विमानतळावर उतरून केरळला रस्तामार्गे पोहोचायचे. यातून देशात कोरोना पसरत गेला. यावेळी अशी दिरंगाई न करता चीनहून किंवा चीनमार्गे येणार्‍या सर्व प्रवाशांची विमानतळावर तपासणी करणे लवकरात लवकर बंधनकारक केले पाहिजे. सध्या तरी भारत सरकारने तसा निर्णय घेतलेला नाही.
कर्नाटकातील बंगळूरू येथे एक तीन महिन्यांची मुलगी आणि एका 8 महिन्यांच्या मुलाला चीनमध्ये धुमाकूळ घालणार्‍या एचएमपीव्ही (ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस) विषाणूची बाधा झाल्याचे आढळले. कर्नाटकपाठोपाठ गुजरातच्या अहमदाबादमध्ये 2 महिन्यांच्या मुलालाही या विषाणूची लागण झाली. त्यामुळे हा विषाणू भारतात पोहोचल्याचे स्पष्ट झाले. कर्नाटकातील दोन्ही बालरुग्णांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाचा त्रास जाणवत होता. त्यांची इथे एचएमपीव्ही चाचणी केली असता त्यातून त्यांना हा आजार जडल्याचे कळले. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील दोन वर्षांची मुलगी बरी झाली असून, तिला घरी पाठवण्यात आले आहे. तर आठ वर्षांच्या मुलाची प्रकृती सुधारत असून, त्यालाही लवकरच घरी पाठवण्यात येईल. या दोन्ही बाळांनी विदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे हा चीनमध्ये पसरत असलेल्या एचएमपीव्ही विषाणूचाच हा प्रकार आहे का, हे अद्यापी स्पष्ट झालेले नाही. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, हा व्हायरस नवा नाही. तो 2001 मध्ये पहिल्यांदा सापडला होता. या विषाणूमुळे श्‍वसनाचा थोडाफार त्रास होतो, हे खरे आहे. त्यामुळे घाबरण्यासारखे कारण नाही.
अहमदाबादमधील दोन महिन्यांच्या मुलाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे 15 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाला सर्दी आणि तापाचा त्रास होता. सुरुवातीला त्याला पाच दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या अनेक चाचण्यांमध्ये मुलाला विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
हे रुग्ण आढळल्यानंतर देशभरात चिंता वाढली आहे. अनेकांना चार वर्षांपूर्वी हाहाकार उडवणार्‍या कोरोनाची आठवण झाली. विशेष म्हणजे, कोरोनाप्रमाणे या रोगाचा उद्रेक चीनमध्येच झाला आहे. तसेच या रोगाची लक्षणे कोरोनासारखीच आहेत. या रोगात सर्दी, ताप, घसा खवखवणे, नाक वाहणे, श्‍वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळतात. कोरोनाप्रमाणे हा विषाणूही श्‍वसनसंस्थेवर परिणाम करतो. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये किंवा 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या वृध्दांना त्याची लागण होऊ शकते. गरोदर स्त्रियांना, प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनाही या विषाणूचा धोका असतो. हा विषाणूही कोरोनाप्रमाणेच संसर्गजन्य असून हस्तांदोलन, आजारी माणसाच्या संपर्कात येणे, रुमालाचा पुनर्वापर, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे तो पसरू शकतो. त्यामुळेच त्याची भीती जास्त आहे. एचएमपीव्ही विषाणू 2001 मध्ये पहिल्यांदा नेदरलँड देशात सापडला होता. 2023 मध्ये नेदरलँड, ब्रिटन, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही हा विषाणू आढळला. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याचा चीनमध्ये प्रादुर्भाव सुरू झाला. या विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यावर चीनमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी जाहीर करण्यात आली. सध्या चीनमधील रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.
विशेष करून बालरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चीनमधून येणारे फोटो आणि व्हिडिओ अस्वस्थ करणारे आहेत. कोरोनाचा जिथून उगम झाला, त्या वुहानमध्येच या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. चीनमधील रुग्णांची संख्या ती नेमकी किती आहे आणि आजारामुळे किती मृत झालेत, याची माहिती अजून मिळालेली नाही. चीनने या विषाणूविषयी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. कोरोनाच्या वेळीही चीनने अशीच लपवाछपवी केली होती. त्याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागले होते. लॉकडाऊनची धास्ती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही. त्यामुळेच आता विशेष सावधगिरी बाळगली जात आहे. मलेशिया आणि हाँगकाँगमध्येही रुग्ण वाढत आहेत. भारतात रुग्ण आढळल्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
कर्नाटक आणि गुजरातने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून, मास्क वापरणे, सॅनिटायझरने हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे शक्यतो टाळणे, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतही असे रुग्ण आल्यास त्याची सरकारला ताबडतोब माहिती देण्यास, औषधांचा साठा करून ठेवण्यास रुग्णालयांना सांगितले आहे. अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात या विषाणूचा रुग्ण अद्याप सापडलेला नाही. परंतु या रोगाचे रुग्ण आढळल्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज तातडीने आरोग्य विभागाची आज बैठक बोलावली होती.आता केंद्रिय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले की, भारतात श्‍वसनाशी संबंधित विषाणूजन्य रोगांमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही चीन तसेच शेजारील देशांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

कुंभमेळ्याला धोका
प्रयागराज येथे 12 जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. या कुंभमेळ्याला लाखो भाविक येणार आहेत. तिथे या विषाणूचा संसर्ग झाल्यास भयंकर संकट उद्भवेल. त्यामुळे कुंभमेळ्यात चीनमधून येणार्‍या पर्यटकांवर बंदी घाला, अशी मागणी काही महंतांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top