शिरुर- दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील जांबूत परिसरात एका बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई खाडे या महिलेच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर मात्र वनविभागाने खडबडून जागे होत अखेर एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
वनविभागाने घटनास्थळापासून ३०० फूट अंतरावर पिंजरा लावला होता.या पिंजऱ्यात काल पहाटे एका चार वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात आले.या बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात केली आहे,अशी माहिती वनकर्मचारी महेंद्र दाते यांनी दिली. दरम्यान,घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात एकूण दहा पिंजरे लावण्यात आले असून बिबट्या प्रवणक्षेत्र भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.