पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ‘ग्यानबा-तुकाराम’ नामाचा जयघोष करीत आज पिंपरे गावात पोहोचला. तिथे नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाली.
पालखीने सकाळी साडेआठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला. नीरा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माऊलींचा पालखी सोहळा अकरा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर पालखी सोहळ्याचे स्वागत आमदार संजय जगताप, सरपंच तेजश्री काकडे आदी पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. साडेअकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या काठावरील नयनरम्य स्थळी विसावला.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सीमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान घातले जाते. शनिवारी दुपारचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला.