पणजी- धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना हा गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एकमेव साखर कारखाना आहे. या कारखान्यातील कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले जात आहे.यासाठी कामगारांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्यात गोमंतक सरकार असताना ४४ वर्षांपूर्वी हा संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला होता. मात्र काही वर्षांपूर्वी हा कारखाना डबघाईला आल्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.हा कारखाना बंद असला तरी कामगारांनी नोकरी टिकवून ठेवण्यासाठी धडपड चालवली आहे.या कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची कल्पना पुढे आली होती.मात्र, गेल्या वर्षी या कारखान्यातील कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. पण कामगारांनी त्यास नकार दिला होता. पण आता पुन्हा एकदा कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी, असा प्रयत्न सुरू झाला आहे. स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पण कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू केल्यास कारखाना पुन्हा सुरू होईल, अशी आशा कामगारांना आहे.