पणजी- गोवा आणि बेळगावला जोडणार्या चोर्ला घाट गेल्या आठ दिवसांपासून निळ्या आणि जांभळ्या कारवी फुलांनी बहरून गेला आहे. त्यानिमित्त चोर्ला घाटातील म्हादई संशोधन केंद्राच्या परिसरात नुकताच कारवी पुष्पोत्सवाचा सोहळा पार पडला.
या महोत्सवात पर्यावरणप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि विद्यार्थी मिळून सुमारे १०० जणांनी सहभागी होत कारवी फुलांची माहिती आणि महत्त्व जाणून घेतले. या घाटात सात वर्षे काहीच नसते. त्यानंतर अचानक फुले येतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले लेऊन जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात, तेव्हा डोंगर उतारांना त्या रंगाच्या छटा प्राप्त होतात. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्या या बहराच्यावेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन बसतात,हे दृश्य चोर्लाघाटात सध्या सुरू आहे. याआधी २०१६ मध्ये याठिकाणी कारवीच्या फुलांना बहर आला होता.
यंदाच्या या महोत्सवात ज्येष्ठ लोकगायिका लक्ष्मी नागेश झर्मेकर यांचा नऊवारी कापड व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.म्हादई संशोधन केंद्राचे प्रमुख निर्मल कुलकर्णी, अक्षत्रा फर्नांडिस, विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.