गुहागर – तालुक्यातील अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. यामध्ये २ कोटी ५ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून आरोपींवर गुन्हादेखील दाखल केला आहे.
गुहागर पोलिस अंजनवेल येथे गस्त घालत असताना त्यांना डिझेल तस्करीची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर अंजनवेल जेटी किनारी रात्री १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान ते गेले एका मच्छीमारी बोटीतून मोटर व पाईपच्या साहाय्याने ९ व्यक्ती डिझेल तस्करी करीत असल्याचे आढळले. या डिझेल तस्करीकरिता वापरण्यात आलेली मच्छिमारी बोट,बोटीवरील मोटर व पाईप, टँकर , बलेनो कार पोलिसांनी जप्त केली आहे. मच्छिमार बोटीतून २५ हजार लिटर डिझेल व आरोपीच्या ताब्यातील ९ मोबाईल गुहागर पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण २ कोटी ५ लाख ९५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.