अहमदाबाद – रेल्वे बोर्डाने गुजरातच्या पहिल्या रेल्वे सिलिंक प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे सौराष्ट्र ते मुंबई व भावनगर यातील अंतर कमी होणार आहे. दहेज ते भावनगर येथे समुद्रावर एक भव्य पूल उभारून त्याद्वारे रेल्वे वाहतूक होणार असून या प्रकल्पाचा मार्गाचे सर्वेक्षण केले जाणार आहे.दहेज ते भावनगर या ४० किलोमीटरच्या रेल्वे सिलिंक प्रकल्पामुळे भावनगरला जाण्यासाठी अहमदाबाद, बडोदा व आनंद हा फेरा घेऊन जाण्याची गरज उरणार नाही. या सर्वेक्षणासाठी रेल्वेने १ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. सध्या भावनगर ते सुरत प्रवासाला ९ तास लागतात. हा ५३० किलोमीटरचा प्रवास अहमदाबाद, आनंद आणि बडोदा मार्गे होतो. सिलिंक प्रकल्प झाल्यास हे अंतर केवळ १६० किलोमीटर एवढे होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळही ३ तास कमी होणार आहेत. यामुळे रस्ते व विमान मार्गाच्या प्रवासापेक्षाही रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे. मुंबई व सौराष्ट्रातून भावनगरला येणाऱ्या लोकांनाही अहमदाबादचा ५०० किलोमीटरचा फेरा घ्यावा लागणार नाही.
गुजरातमधील पहिल्या रेल्वे सिलिंक सर्वेक्षणाला मंजुरी
