दिसपूर – गुगल मॅपमुळे आसाम पोलिसांचे १६ जणांचे पथक थेट परराज्यात पोहचले. या मॅपच्या सुविधेमुळे रस्ता सापडण्यास सहाय्य मिळते, परंतु अनेकदा चुकीचा मार्ग दाखवल्यामुळे अपघाताच्या घटनादेखील घडतात. त्यामुळे अनेकांना मनस्ताप होतो. परंतु, ही घटना पोलिसांसोबत घडल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
७ जानेवारीला आसाम पोलिसांचे १६ जणांचे एक पथक एका ठिकाणी आरोपीला पकडण्यासाठी जात होते. नियोजनानुसार छापा टाकण्यासाठी पथक निघाले. जातांना पोलिसांनी गुगल मॅपचा वापर केला. गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवल्यामुळे आसामचे पोलीस थेट नागालँडमध्ये मोकोकचुंग जिल्ह्यात पोहोचले. त्यावेळी स्थानिक लोकांनी पोलीस पथकावर दरोडेखोर समजून हल्ला केला आणि त्यांना गुन्हेगार समजून रात्रभर कैद करून ठेवले.
दरम्यान,या संपूर्ण घटनेची माहिती नागालँड पोलिसांना दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. घडलेल्या प्रकाराची माहिती नागालँड पोलिसांनी घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका केली.