देहरादून – उत्तराखंड मध्ये आज व उद्या होणाऱ्या पुस्तक प्रदर्शनात महात्मा गांधी व पं. जवाहरलाल नेहरुंची पुस्तके विक्रीला ठेऊ नये, असा दबाव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने टाकल्यामुळे हे पुस्तक प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. विद्यापीठाने प्रदर्शन रद्द होण्याची विविध कारणे दिली असली तरी केवळ याच कारणाने हे पुस्तक प्रदर्शन रद्द केल्याचे म्हटले जात आहे.
डेहराडून च्या एचएनबी गढवाल विद्यापीठाच्या पौरी गढवाल येथील श्रीनगरमधील १५ व १६ फेब्रुवारी रोजी किताब कौतुक या नावाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या आधी जानेवारी महिन्यात हे प्रदर्शन सरकारी मुलींच्या शाळेत भरवण्यात येणार होते.
त्यालाही विरोध झाल्याने आयोजकांनी रामलीला मैदानावर पुस्तक प्रदर्शनाची तयारी केली. ही जागा आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षित केल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात या पुस्तक प्रदर्शनासाठी परवानगी मागण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने आधी ती परवानगी दिली होती नंतर मात्र अभाविपच्या दबावामुळे तीही रद्द केली. विद्यापीठातर्फे परीक्षांचे कारण देत हे प्रदर्शन रद्द केल्याचे स्पष्टीकरण दिले. अभाविप व विद्यापीठानेही गांधी व नेहरुंच्या पुस्तकामुळे प्रदर्शन रद्द केले नसल्याचे म्हटले असले तरी दरवर्षी होणारे हे प्रदर्शन यंदा रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.