खासदारकी दिलीत मग सांगाल ते करीन! मिलिंद देवरा-आदित्य ठाकरे लढा

मुंबई- वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाला तगडा उमेदवार मिळेना म्हणून शेवटी स्व. मुरली देवरा यांचे पुत्र खा. मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटानेच राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. वरळी मतदारसंघात शून्य काम असूनही केवळ खासदारकी दिली या उपकाराची परतफेड करण्यासाठी मिलिंद देवरा हे आदित्यच्या विरोधात लढायला तयार झाले आहेत. खासदार असताना आमदारकी लढविण्याचा कमीपणा पचविण्यासही मिलिंद देवरा तयार झाले आहेत.
खासदार मिलिंद देवरा यांनी आज एक्स पोस्ट करत म्हटले की, वरळी आणि वरळीकरांना मी न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवला. लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत आमचे पुढील धोरण जाहीर करू.
वरळी मतदारसंघातील लढत शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा कुठल्याही परिस्थितीत पराभव करायचा त्यांनी चंग बांधला आहे. महायुतीची पूर्ण ताकद वरळीत लावली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. देशपांडे यांना छुपा पाठिंबा द्यायचा आणि आपला उमेदवार उभा करून मतविभाजन करायचे हे तंत्र आहे. परंतु शिंदे गटाला उमेदवारच सापडत नव्हता. या मतदारसंघात शिंदे कुटुंबातीलच एखादा सदस्य निवडणूक लढवेल, अशीही चर्चा होती. भाजपाच्या शायना एनसी यांचे नावही पुढे आले होते. परंतु त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना शह देणारा उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर मिलिंद देवरा यांचे नाव पुढे आले.
यासंदर्भात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, मिलिंद देवरा वरळीतून नक्की जिंकून येतील. त्यांचे काम, त्यांची प्रतिमा यामुळे ते वरळीतून विजयी होऊ शकतात, असा मला विश्वास आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून याआधी ते दोन वेळा खासदार राहिलेले आहेत. उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मिलिंद देवरा यांच्या नावाबद्दल थेट प्रतिक्रिया न देता म्हटले की वरळीत एकनाथ शिंदे यांनी स्वतः उभे राहावे किंवा वरळीत आणि अन्य ठिकाणी उमेदवार मिळत नसतील तर त्यांनी बाहेरून उमेदवार आयात करावा किंवा वरळीतून एकनाथ शिंदे यांनी जय शहा यांना उमेदवारी द्यावी. मुरली देवरा हे जन्मभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले, काँग्रेसनेही त्यांना भरभरून दिले. लोकसभा उमेदवारी, राज्यसभेचे बक्षीस, पेट्रोलियमसारखे महत्त्वाचे खाते, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जबाबदारीचे स्थान, महापौर पद असे सर्व त्यांना काँग्रेसने दिले. महापौर बनण्यासाठी त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच पूर्ण मदत केली होती. मुरली देवरा यांनी हे लक्षात ठेवून सर्वच पक्षातील नेत्यांशी अत्यंत प्रेमाचे संबंध ठेवले.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मिलिंद देवरा याला मात्र राजकारणात यश मिळाले नाही. मुंबई दक्षिण मतदारसंघ त्यांच्या वडिलांनी बांधून ठेवला होता, पण मिलिंद देवरांना तो राखता आला नाही. सत्तेचा मौका आयता चालून येत आहे हे दिसताच त्यांनी काँग्रेसचे ऋण विसरून सरळ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा आपल्याला जिंकता येणार नाही हे कळल्याने राज्यसभा पदरात पाडून घेतली. आता तर ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीने आपले वडील महापौर बनले त्यांच्या नातवाला पराभूत करायला आपला मतदारसंघही सोडून वरळीला निघाले आहेत. त्यांच्या स्वतःच्या मुंबई दक्षिण मतदारसंघात गेले काही वर्षे ते दिसतच नव्हते. आता ते वरळी मतदारसंघात उमेदवारी करणार आहेत ज्याची त्यांना जवळजवळ काहीही माहिती नाही. केवळ मते खाऊन आदित्य ठाकरेंना पाडायचे हा त्यांचा एकमेव हेतू आहे. शिंदे यांना वरळीकरांना न्याय द्यायचा आहे म्हणून मी तिथून लढतो आहे अशा भूलथापा त्यांनी ट्विट केल्या.
मिलिंद देवरा वरळीत हरणारच आहेत. आपण पराभूत झालो तर राज्यसभेची खासदारकी आहेच हे ते जाणून आहेत. 24 नोव्हेंबरला म्हणजे निकालाच्या दुसऱ्या दिवशी मुरली देवरांची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी आपला मुलगा सत्तेसाठी राजकारणाच्या दलदलीत उतरून आपल्यासमोर उभा आहे, हे मिलिंद देवरा कोणत्या शब्दांत वडिलांना सांगेल हे जाणण्याची उत्सुकता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top