नंदुरबार- पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ,सोलापूर पाठोपाठ आता खान्देशात गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडले आहेत.नंदुरबारमधील दोन बालकांना जीबीएस आजाराची लागण झाली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नंदुरबार येथे जीबीएसचे दोन रुग्ण आढळले असून दोन्ही रुग्ण ही लहान बालके आहेत.दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.ज्या गावात हे रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणच्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे.नंदुरबारमध्ये जीबीएसचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. याठिकाणी २० आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत.जीबीएस या आजारासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोममध्ये बाहेरील विषाणू किंवा जिवाणूंवर हल्ला करणारी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात,असे या आजाराचे स्वरूप आहे.स्नायू कमकुवत होऊ शकतात. हाता-पायातील संवेदना कमी होऊ शकते. गिळताना किंवा श्वास घेताना त्रास होऊ शकतो.