बंगळुरू- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबावर पहिल्यांदाच भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरगे कुटुंबाच्या ट्रस्टला कर्नाटक सरकारने बंगळुरूमधील हाय टेक डिफेन्स एअरोस्पेस पार्कमध्ये जमीन दिली आहे. यावरून भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला असून, खरगे कुटुंबाला जमीन कशी दिली, असा प्रश्न विचारत सरकारच्या या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धिरामय्या यांच्या जमिनीशी संबंधित ‘मुदा’ घोटाळ्यानंतर भाजपाचे हे नवे प्रकरण बाहेर काढले आहे. भाजपाचे राज्यसभा सदस्य लहारसिंग सिरोया यांनी काँग्रेसवर आरोप केला आहे की, मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबाच्या ‘सिद्धार्थ विहार ट्रस्ट’ला कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळाच्या एकूण 45.94 एकर जमिनीपैकी 5 एकर जमीन नागरी सुविधांसाठी अनुसूचित जाती कोट्याअंतर्गत देण्यात आली आहे. खरगे कुटुंब कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाच्या जमिनीसाठी पात्र होण्यासाठी एअरोस्पेस उद्योजक कधी झाले? कर्नाटकचे मोठे व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी यावर्षी मार्च महिन्यात या वाटपाला संमती कशी दिली? हे सत्तेचा गैरवापर, घराणेशाही आणि हितसंबंधांचे प्रकरण आहे का? ही जमीन एससी, एसटी कोट्यातली सर्वसामान्य लोकांसाठी खास करून तरुणांसाठी आहे. त्यांनी शिकून इथे काहीतरी उद्योग सुरू करावेत, हा हेतू आहे. ही जमीन राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसाठी नाही. या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास व्हायला हवा. सिद्धार्थ विहार ट्रस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे, त्यांच्या पत्नी राधाबाई खरगे, त्यांचे जावई आणि गुलबर्गाचे खासदार राधाकृष्ण, आणखी एक मुलगा आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे आणि दुसरा मुलगा राहुल खरगे यांचा समावेश आहे. भाजपाने या कथित बेकायदेशीर जमीन वाटपाचे प्रकरण एका आरटीआय कार्यकर्त्याच्या माध्यमातून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या कार्यालयात दाद मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी होईल का, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना म्हैसूरमधील वादग्रस्त म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ॲथॉरिटीची जागा परत करावी लागली, तशी खरगे हेही जमीन परत करतील का, असा सवालही भाजपाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, सिद्धार्थ विहार ट्रस्टवर यापूर्वीही 19 एकर जमिनीचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आहे.
या आरोपांवर खरगे यांच्या कुटुंबाकडून किंवा काँग्रेसकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या आरोपामुळे मुदा घोटाळा प्रकरणावरून आधीच वादात सापडलेले सिद्धारामय्या आता नव्या अडचणीत सापडलेले आहेत.