मुंबई
मुंबईतील कोस्टल रोडच्या वांद्रे ते वरळी सी- लिंक प्रवासाची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. वांद्रे सी- लिंक ते वरळी थडानी जंक्शनपर्यंत दोन अधिक दोनपैकी एक मार्गिका ११ जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी माहिती दिली.
“वांद्रे सी-लिंक ते वरळीपर्यंतची एक मार्गिका गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे आयुक्त गगराणी यांनी सांगितले. या प्रकल्पाचे ९१.५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, वांद्रे सी-लिंक ते वरळीपर्यंत जोडणाऱ्या उत्तरेकडील बाजूचे काही काम अजूनही शिल्लक असल्याने येथील सर्व मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करणे सद्यस्थितीत शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही नवी मार्गिका खुली झाल्याने दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात दूर होणार आहे. सुमारे ७० टक्के वेळेची, तर ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे.