कोल्हापूर – शरद कृषी महाविद्यालय व शरद शिक्षण व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संमेलन येत्या ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी जयसिंगपूर येथील सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे पार पडणार आहे. या संमेलनाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
या संमेलनासाठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे व संयोजक, मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ डॉ. सतीश बोरुलकर यांनी मागणी केली होती. या अनुषंगाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात दोन दिवस शेती व शेतकरी यांच्या संदर्भातील परिसंवाद, चर्चासत्रे, प्रबोधनपर व्याख्यान, महाराष्ट्रातील शेतीची सद्यस्थिती, कवी संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील अनेक शेतकरी व शेती तज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.