पाटण – कोयना अभयारण्यात तपकिरी रंगाचा दुर्मिळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी आढळला आहे.’डिस्कवर कोयना’ या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा प्राणी आढळला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश शेलार,संग्राम कांबळे व सागर जाधव यांनी दिली.
कोयना विभागात पर्यटनासोबत वन्यजीवांचे छायाचित्रीकरण, संशोधन, जैवविविधतेचा अभ्यास करणारी ‘डिस्कवर कोयना’ या संस्थेच्या सदस्यांना छायाचित्रिकरण करताना एक दुर्मिळ प्राणी कॅमेरात कैद झाला. संस्थेच्या सदस्यांनी कॅमेरामधील प्राण्याचे बारकाईने निरीक्षण केले. तेव्हा हा पश्चिम घाटातच आढळणारा ‘तपकिरी पाम सिवेट’ असल्याचे सिद्ध झाले. हा प्राणी गोव्यातील मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्पाच्या उंच पर्जन्यवनात आढळतो, तिथे टिकून राहण्याची त्याची क्षमता ही फळझाडांच्या प्रजातींच्या विविधतेवर अवलंबून असते. तपकिरी पाम सिवेट हा एकाकी व निशाचर प्राणी आहे. तो दिवसा झाडांच्या डोली, पोकळ्या, वेलीचे जाळे, शेकरूचे घरटे आणि फांद्यांच्या काट्यामध्ये आराम करत असतो. काही वेळा रात्री उघड्या फांद्यांत विश्रांती घेत असतो. प्रामुख्याने हा झाडाची फळे खाऊन जगणारा प्राणी आहे.