नवी दिल्ली – दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आपमधील वाद आज शिगेला पोहोचला. दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि आप स्वतंत्र लढवणार आहेत. त्यातून या मित्रपक्षांमध्ये जुंपली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी काल अरविंद केजरीवाल सगळ्यात मोठे फ्रॉड आणि देशद्रोही आहेत, असा गंभीर आरोप केला होता. आपच्या मोफत उपचार आणि महिलांना 2,100 रुपये देण्याच्या घोषणेविरोधात युवक काँग्रेसने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे संतापलेल्या आपने 24 तासांत माकन यांच्यावर कारवाई करा. अन्यथा आप इंडिया आघाडीत राहणार नाही. तसेच काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढू, असा सज्जड इशारा काँग्रेसला दिला. त्यामुळे इंडिया आघाडीच्याच दोन घटक पक्षांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आपचे दिग्गज नेते संजय सिंह यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य आणि काँग्रेस सध्या घेत असलेल्या भूमिकेवर स्पष्ट झाले आहे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाशी संगनमत केले आहे, हे स्पष्ट होते. दिल्लीत केजरीवाल यांना हरविण्यासाठी भाजपा काँग्रेसला पैसे पुरवत आहे. माकन केजरीवाल यांना देशद्रोही म्हणाले. त्यांनी असा आरोप भाजपाच्या एकाही नेत्यावर केला आहे का? आम्ही काँग्रेस पक्षाकडे माकन यांच्यावर 24 तासांत कारवाई करण्याची मागणी करत आहोत. अन्यथा आम्ही काँग्रेस पक्षाला इंडियातून वेगळे काढण्यासाठी इतर विरोधी पक्षांशी बोलू.
संजय सिंह यांनीदेखील काँग्रेसवर उघडपणे आरोप केले. ते म्हणाले की, दिल्लीत काँग्रेस भाजपासोबत गेल्याचे स्पष्ट दिसते. निवडणुकीत भाजपला फायदा होईल असे सर्व काही काँग्रेस करत आहे. अजय माकन भाजपाच्या इशार्यावर केजरीवालविरोधी वक्तव्ये करीत आहेत. ते भाजपाची स्क्रिप्ट वाचतात. भाजपच्या इशार्यावर ते आम आदमी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करतात. काल तर त्यांनी केजरीवाल यांचा उल्लेख देशद्रोही असा करून परिसीमाच गाठली. अजय माकन यांच्यावर काँग्रेसने जर 24 तासांच्या आत कारवाई केली नाही तर आप काँग्रेससोबत इंडिया आघाडीत राहणार नाही.
कालच काँग्रेसने आप आणि भाजपाविरोधात 12 कलमी श्वेतपत्रिका जारी करून आपवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी आपसोबत युती करणे ही काँग्रेसची चूक होती, जी आता सुधारली पाहिजे, असेही माकन म्हणाले. केजरीवाल यांना त्यांनी फर्जीवाल संबोधले होते.