लखनौ – उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात वेगवेगळे साधू लक्ष वेधून घेत आहेत. त्यातील ‘अनाजवाले बाबा’ सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या
अनाजवाले बाबांनी आपल्या डोक्यावरील जटेत गहू,बाजरी,हरभरा आणि वाटाणा पिकवला आहे.हे साधू बाबा हठयोगासाठी प्रसिद्ध आहेत. पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी ते आपल्या डोक्यावरच पीक उगवतात.
या ‘धान्य बाबां’चे खरे नाव अमरजीत असून त्यांनी आपल्या डोक्याला शेत बनवले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा, वाटाणाचे पीक घेतले आहे. या बाबांच्या डोक्यावर पिके पाहून लोकांना आश्चर्यचा धक्का बसत आहे. बाबा दररोज आपल्या डोक्यावरील रोपांची वाढ व्हावी, यासाठी पाणी देतात.कुंभमेळ्यात ते पर्यावरण वाचवा मोहिमेचे प्रतीक बनले आहेत.
आपल्या सुपीक डोक्याबद्दल त्यांनी सांगितले की, जंगलतोड वाढत आहे. त्यामुळे मला लोकांना अधिकाधिक झाडे लावण्यासाठी प्रेरित करायचे आहे.