पुणे –बिग ४ अकाउंट फर्मच्या एनवाय कंपनीच्या पुण्यातील एका शाखेतील ऍना सॅबेस्टियन (२६ )चार्टर्ड अकाउंटंट या तरुणीच्या कामाच्या दबावामुळे मृत्यू झाला, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी कंपनीवर केला आहे. तिच्या मृत्यूनंतर ऍनाच्या आईने भारतातील कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिले आहे. मुलीने मार्च २०२४ मध्ये कंपनीत नोकरी पत्करल्यापासून ती नेहमीच कामाच्या तणावाखाली असायची. ऍनाचा २० जुलै रोजी मृत्यू झाला. मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या कंपनीतले किंवा ऑफिसमधले कुणी नव्हते असे तरुणीच्या आईने म्हटले आहे. तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
ऍनाच्या आईने म्हटले की, ऍनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिने मार्च २०२४ मध्ये एनवायमध्ये काम करायला सुरुवात केली. ती आंनंदीत होती कारण तिला नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळाली होती. पण अवघ्या चार महिन्यांनंतर ऍनाच्या मृत्यू झाला. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल, असे सांगून तिला अधिक काम करण्यास प्रवृत्त केले जायचे. ओव्हरवर्किंग सर्व कामगार करतात असे सांगून कौतुक करण्यात यायचे. अनेकदा ती रात्रभर कंपनीत काम करायची. त्यामुळे ती झोपायचीही नाही. तिला अनेकदा कार्यालयीन वेळेनंतर काम दिले जात होते आणि ते पूर्ण करण्यासाठी अवघे काही तास दिले जायचे. यामुळे तिची तब्येत बिघडली.