मुंबई- राज्यात काँग्रेसने महायुतीविरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो स्कॅनरवर असलेले छायाचित्र लावले आहे. तसेच, त्यावर ५० टक्के कमिशन स्वीकारण्यात येईल, असा उल्लेखही आहे. त्यासह क्यूआर कोड स्कॅन केल्यावर सहा प्रश्न दिसतात. हे प्रश्न महायुती सरकाराच्या कारभारासंबंधित आहेत. यातील प्रश्नांना हो, नाही आणि अन्य असे तीन पर्याय दिले आहेत.
अडीच वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार आल्यापासून खोके सरकार, कंत्राटदारांचे सरकार, असे आरोप महाविकास आघाडीकडून केले जात आहेत. आता काँग्रेसने कर्नाटकच्या धर्तीवर महायुती सरकारविरोधात मोहीम सुरू केली आहे. कर्नाटक काँग्रेसने एप्रिल-मे २०२३ मध्ये कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात वातावरण निर्माण केले होते. बोम्मई यांचा फोटो स्कॅन कोडवर छापून ‘पेसीएम’ आणि ४० टक्के कमिशन घेतले जाईल, असे म्हटले होते. या प्रचाराचा फायदा काँग्रेसला झाला होता. कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आली होती.