पोलादपूर – मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर ते खेड दरम्यान असलेल्या धोकादायक कशेडी घाटातील दुसरा भुयारी मार्गही सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आता या दोन्ही नवीन भुयारी मार्गामुळे चाकरमान्यांना सुसाट प्रवास करता येणार आहे.
कशेडी घाटातील या दोन्ही भुयाराला वारली चित्रकला आणि तिरंगा चित्र काढून सजविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्यात असल्याचे एसडीपीएल कंपनीकडून सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पळस्पे ते कशेडी घाटातील भुयारी मार्गापर्यंतचा दौरा केला होता. त्यावेळी भुयारी मार्गातील विद्युत प्रकाशझोत आणि वायू विजनासाठी विद्युतप्रवाह सुरू करण्यासाठी महावितरणच्या संपर्कात ठेकेदार कंपनीने राहण्याचे सुचविले होते. मात्र, भुयारी मार्गातील विद्युतप्रवाह सुरू न झाल्याने जनरेटरचा वापर काही दिवस केला जाणार आहे. पोलादपूर ते खेड हे दीड तासाचे अंतर पार करण्यासाठी यापूर्वी कशेडी घाटातील वळणावळणाच्या घाट मार्गामुळे ४५ मिनिटांचा कालावधी लागत असे. मात्र,
या भुयारी मार्गामुळे हे अंतर फक्त १० मिनिटात पार करता येत असल्याने सर्व प्रकारची वाहने भुयारी मार्गाने जात आहेत.
कशेडी घाटातील दुसरा भुयारी मार्गही अखेर वाहतुकीसाठी खुला
