मुंबई- म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने मुंबईतील आपल्या पाच राखीव भूखंडांचा १९२ कोटी रुपयांहून अधिक किंमतीला लिलाव केला आहे.या पाच भूखंडांपैकी चार भूखंड शैक्षणिक वापरासाठी, तर एक भूखंड आरोग्याच्या कारणास्तव राखीव ठेवण्यात आला होता. यातील ओशिवरा परिसरातील ८,८५० चौरस मीटरचा भूखंड १२५ कोटी रुपयांना ग्लोबल हेल्थ लिमिटेडच्या मेदांता रुग्णालयाला देण्यात आला आहे.
म्हाडाने ई-लिलावात ओशिवरा भूखंडासाठी मूळ किंमत म्हणून ६७.४९ कोटी रुपये ठेवली होती. त्यासाठी मेदांता रुग्णालयाने १२५ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली. अन्य चार भूखंडांपैकी मुंबईतील मालाड परिसरातील सुमारे दोन हजार चौरस मीटरचा एक भूखंड प्रगत शिक्षण संस्थेने ११ कोटी रुपयांना खरेदी केला असून त्यासाठी म्हाडाने १० कोटी ६६ लाख रुपयांची मूळ किंमत ठेवली होती. तर २००० चौरस मीटरचा दुसरा शैक्षणिक भूखंड १२ कोटी २१ लाख रुपयांना विकण्यात आला असून त्यासाठी म्हाडाने ११ कोटी ८१ लाख रुपयांची मूळ किंमत ठेवली होती. विक्रोळीतील उर्वरित दोन भूखंडांपैकी कन्नमवार नगर येथील महिला पॉलिटेक्निक संस्थेसाठी राखीव असलेला ३,०१० चौरस मीटरचा भूखंड नवचेतना चॅरिटेबल ट्रस्टने १८.०५ कोटी रुपयांना संपादित केला.म्हाडाने या भूखंडासाठी १७ कोटी ७५ लाख रुपयांची आधारभूत किंमत निश्चित केली होती. विक्रोळीतील टागोर नगर हरियाली येथील २०१९.४९ चौरस मीटरचा भूखंड राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थेला १२ कोटी २१ लाखांची बोली लावून जिंकला आहे.मंडळाने त्यासाठी २१ कोटी ५२ लाख रुपयांची आधारभूत किंमत निश्चित केली होती.