पॅरिस- पॅरिसमधील ऑलिंपिक स्पर्धेचा सांगता सोहळा नुकताच पार पडला.स्पर्धेनंतर अनेक खेळाडू मायदेशी परतले आहेत.मात्र उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी मायदेशी परतताना धाकधूक वाढली आहे.कारण उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन पदक न जिंकलेल्या स्पर्धकांना शिक्षा देतात, असा इतिहास आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाच्या स्पर्धकांनी दक्षिण कोरिया स्पर्धकांबरोबर एकत्र येत फोटो घेतल्याने त्यांची धास्ती आणखीच वाढली आहे.
उत्तर कोरियाच्या १६ खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.यातील ६ खेळाडूंनी पदके जिंकली आहेत. त्यात २ रौप्य पदक,४ कांस्य पदकांचा समावेश आहे.मात्र एकाही खेळाडूला सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंचा उत्तर कोरियात मोठा सत्कार, सन्मान केला जातो. पण पदक न जिंकणार्या खेळाडूंना शिक्षा दिली जाते.२०१२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले होते.त्या खेळाडूंचे मोठे स्वागत करत त्याला किम जोंग उनने नदीकिनारी एक अलिशान अपार्टमेंट दिले होते.त्याशिवाय इतरही अनेक सुविधा दिल्या होत्या. मात्र ज्यांनी पदक जिंकले नव्हते.त्यांना खराब अवस्थेत असलेल्या घरात राहण्यास पाठवले होते. इतकेच नाही तर काही खेळाडूंना कोळशाच्या खाणीत काम करायला लावले होते.काही दिवसांनी त्यांना परत बोलावले. यावेळी तर उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांच्या स्पर्धकांनी एकत्र फोटो घेतल्याने किम जोंग उन उत्तर कोरियाच्या खेळाडूंना शिक्षा करणार का, अशी चर्चा होत आहे.