एसटी महामंडळामार्फत कामगार पालक दिन

मुंबई

स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या लहान- मोठ्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने दर सोमवारी आणि शुक्रवारी कामगार पालक दिन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा पालक दिन १५ जुलै पासून दुपारी ३ ते ५ या वेळेत विभागातील एका आगारात आयोजित करण्यात येणार आहे.

विभाग नियंत्रकांनी दर सोमवारी व शुक्रवारी विभागातील एका आगारात जाऊन ‘कामगार पालक दिन’ घ्यावा. ज्यामध्ये आगारातील चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी ऐकून घेऊन तिथेच त्याचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटीच्या स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. एसटी महामंडळात सध्या सुमारे ९० हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत.

स्थानिक पातळीवरील अनेक समस्या वरिष्ठांनी ऐकून घ्याव्यात व त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी किमान अपेक्षा असते. कर्मचाऱ्यांचे अनेक किरकोळ प्रश्न केवळ योग्य अधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने अनुत्तीर्ण राहतात. यावर उपाययोजना म्हणून विभाग नियंत्रक यांनी त्यांचे ‘पालक’ बनून त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात व तातडीने त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून दैनंदिन कामाबाबत असलेल्या तक्रारीमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होणारी अशांतता संपुष्टात येईल. त्यांची मानसिक स्थिती सुदृढ राहील व ते कामाच्या ठिकाणी उत्साहाने कार्यरत राहतील हा या कामगार पालक दिनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top