उत्साही वारकरांच्या जनसागराततुकाबा-ज्ञानेबांचे पहिले रिंगण संपन्न

इंदापूर – इंदापुरातील बेलवाडी येथे टाळ-मृदुंगाचा गजरात आज सकाळी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. बेलवाडीत सकाळी ७ वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांची गर्दी झाली होती. अश्व रिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली, तर फलटणमधील चांदोबाचा लिंब येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पहिले रिंगण पार पडले. त्यात वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत या रिंगण सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.त्यानंतर टाळकरी, पोलीस, होमगार्ड, तुळसी वृंदावनधारक महिला आणि झेंडेकऱ्यांचे रिंगण झाले. रिंगण सोहळ्यानंतर चांदोबाचा लिंब येथील हनुमान मंदिरामध्ये पालखी सोहळा विश्रांतीसाठी विसावला. तत्पूर्वी तहसीलदार श्रीकांत पाटील, तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुख हभप भानुदास महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, हभप अभिजीत महाराज मोरे आदींनी पालखी रथाचे स्वागत केले.ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काल लोणंदनगरीत विसावला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक लोणंदमध्ये जाऊन माउली चरणी नतमस्तक झाले. लोणंद येथील मुक्काम आटोपून सोहळा आज दुपारी मार्गस्थ झाल्यानंतर फलटण तालुक्यातील सरदेचा ओढा येथील लोकांनी स्वागत केले. त्यानंतर फलटणच्या चांदोबाचा लिंब येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण संपन्न झाले. सायंकाळी पालखीचे तरडगाव येथे ग्रामस्थांनी स्वागत केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top