नवी दिल्ली – देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची तीव्र लाट सुरू असून जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात सतत बर्फवृष्टी होत आहे. हिमाचलच्या तीन शहरांमधील तापमान शून्याखाली गेले असून ताबो येथे सर्वात कमी उणे ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथे पुढील ४ दिवस बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
बर्फाळ वाऱ्यांमुळे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंशांच्या खाली नोंदवले गेले. इटावामध्ये पारा ४ अंशांवर पोहोचला. अयोध्येत थंडीमुळे पाचवीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पंजाबमध्येही थंडीची लाट कायम असून अमृतसरमध्ये ४.८ अंशाची नोंद झाली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमानात घसरण सुरूच आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड व्यतिरिक्त, पूर्वोत्तर राज्यांमध्ये दृश्यमानता कमी झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये काल बर्फवृष्टी झाली. हिमालयाच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह ईशान्य भागात दाट धुके पसरणार आहे.