मुंबई – दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन-विरार सीलिंक म्हणजेच सागरी सेतू प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा एमएमआरडीए मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. या ५५ किमी लांबीच्या मार्गासाठी तब्बल ८७ हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्य सरकारची मान्यता मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
हा सागरी सेतू थेट मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेबरोबर विरारजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना थेट दक्षिण मुंबईत पोहोचता येईल. एमएमआरडीएचा जपानच्या जायका वित्तीय संस्थेकडून कर्ज उभारण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्यावर परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याची मंजुरी घेण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाणार आहे.यामध्ये ५५.१२ किमी लांबीचा पूल बांधण्याची योजना आहे.या प्रकल्पाचा पूर्वीचा अंदाजित खर्च ३२,८६५ कोटी रुपये होता. त्यात वाढ होऊन आता प्रस्तावित खर्च ८७,४०० कोटी इतका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान,या प्रकल्पात २४.३५ किमी लांबीचा सीलिंक तीन प्रमुख कनेक्टर्ससह एकूण ३०.७७ किमी लांबीचा असेल.उत्तन कनेक्टर ९.३२ किमी, वसई कनेक्टर २.५ किमी आणि विरार कनेक्टर सर्वात लांब १८.९५ किमी असेल, ज्यामध्ये अर्नाळा किल्ल्याजवळ १.२ किमी लांबीची सुरुंग असेल. सीलिंकमध्ये आठ लेन असतील, प्रत्येक दिशेस चार, तर कनेक्टर्समध्ये प्रत्येकी तीन दिशेस सहा लेन असतील.