सांगली – एसटी महामंडळाने पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी यात्राकाळात सांगली जिल्ह्यातून २६० जादा बसेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १३ जुलै ते २२ जुलैपर्यंत या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.तसेच कोणत्याही गावांतून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्र मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावांतून एसटी बसेस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
थेट गावातून जाणार्या भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा,असे आवाहन एसटी महामंडळ सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले यांनी केले आहे.यात्रेसाठी अधिकारी, कर्मचारी,तांत्रिक कर्मचारी असे एकूण २५ जणांची पंढरपूरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. आषाढी एकादशी १७ जुलै रोजी असून जादा बसेस १३ ते २२ जुलैपर्यंत सोडण्यात येणार आहेत.मागील वर्षी सांगली जिल्ह्यातून एसटीकडून १९० विशेष बसेस सोडल्या होत्या. आषाढी यात्रेसाठी देखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.