फलटण – सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आळजापुर गावामध्ये दारूची उभी बाटली आडवी करण्यासाठी म्हणजेच गावामध्ये दारूबंदीसाठी महिलांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण ७२३ मतदारांपैकी ४८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये गावांमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी ४५४ जणांनी मतदान केले व गावामध्ये दारू विक्री सुरू ठेवावी यासाठी १९ जणांनी मत नोंदवले. त्यामुळे दारूबंदी करण्याची मागणी करणाऱ्यांचा विजय झाला.
या मतदान प्रक्रियेतील ४८० मतदानामध्ये ७ मते ही अवैध ठरल्याची माहिती तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी दिली. आळजापूर गावामध्ये दारूबंदी व्हावी, अशी गावांमधील महिला गेल्या वर्षभरापासून मागणी करीत होत्या.त्यांनी मागील काळात राज्याचे तत्कालीन सातारा येथील उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरावर मोर्चा काढून गावांमध्ये दारूबंदी करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने काल गावामध्ये दारूबंदीसाठी प्रशासनाच्या वतीने मतदान घेण्यात आले. निवडणूक पर्यवेक्षक म्हणून निवासी तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी काम पाहिले.