आरोपीचा पक्ष न पाहता मुसक्या आवळा! राज ठाकरे

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात विनयभंग झालेल्या एका पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपीचा पक्ष न पाहता त्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील भंडार आळीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी सत्ताधारी शिंदे गटाच्या सचिन यादव नामक एका उपविभागप्रमुखाचे नाव पुढे आले होते. त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मनसेसह नागरिकांनी काल मोर्चा काढला होता. यावेळी आरोपीवर अतिरिक्त कलमे लावून त्याला मंगळवारपर्यंत अटक करण्यात आली नाही तर ठाणे बंदची हाक दिल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आरोपीचा पक्ष कोणता हे न पाहता त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. माझे पोलिसांशी बोलणे झाले आहे. बदलापूरसारखे तुम्ही हे प्रकरण अंगावर घेऊ नका. आरोपी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे महत्त्वाचे नाही. कारण, कोणत्याही पक्षाची कधी अशी भूमिका नसते. पण एखाद्या पक्षाने आपल्या कार्यकर्त्याच्या विकृतीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, तर आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला अटक झाली पाहिजे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालय आरोपीला जामीन देतेच कसा? या प्रकरणी पीडित मुलीचा जबाब नोंदवून आरोपीला तत्काळ अटक करा.
पुढे ते म्हणाले की, सरकारने टोलमुक्तीचे आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. हे आंदोलन आम्ही घरच्या सत्यनारायणासाठी केले नव्हते. ते आंदोलन आम्ही जनतेसाठी केले होते. टोलमुक्ती मिळाल्यानंतर आज सर्वजण आनंदी असतील. पण एवढी वर्षे टोलधाड आपल्यावर पडली, टोलचे किती पैसे जमा झाले, ते कुणाकडे गेले याची कोणताही कल्पना नव्हती.आमचा पक्ष एवढ्या वर्षांपासून याविरोधात आंदोलन करत आहे. त्याला आता यश आले आहे. त्यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे काम अभिनंदनीय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top