नाशिक – नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षक नाशिकरोड रेल्वेस्थानक येथील हॉटेलमध्ये आपले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर वेटरवर रोखल्याने वादात सापडला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला अटक करून नाशिकरोड न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झगडेला जामीन मंजूर केला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक गिरी यांनी दिली.
झगडे हे मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल व्यवस्थापक सागर पाटील यांच्या मालकीच्या रामकृष्ण हॉटेलमध्ये हे जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या शेख याने त्यांना ऑर्डर घेताना रोटी नसल्याचे सांगितले. त्यावरून झगडे व त्यांच्यासोबत असलेल्या दोघांनी वाद घातला. झगडेने कंबरेला असलेली पिस्तूल काढून शेखवर रोखली. ‘मला रोटी पाहिजे, तू तिकडे काहीही कर’ असा दम देत, शिवीगाळ केली. यानंतर सागर पाटील व सीरॉन शेख यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत झगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाने याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली. वेटरवर झगडे यांनी रोखलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केली आहे.