स्टॉकहोम- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची परवानगी दिल्यानंतर तणाव आणखी वाढला.या तणावाची झळ रशियाच्या सीमेजवळ असलेल्या तीन नाटो देशांमध्येही पोहोचली आहे. रशियाने केलेल्या पलटवाराने नॉर्वे,स्वीडन आणि फिनलंड या तीन नाटो देशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे आता या तिन्ही देशांनी आपल्या नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक गोष्टींचा साठा ठेवण्याची आणि आपल्या सैनिकांना युद्धासाठी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नॉर्वेने आपल्या नागरिकांना युद्धाबद्दल चिथावणी देणारी पत्रके आणि पॅम्प्लेट वितरित केली आहेत. स्वीडननेही आपल्या नागरिकांना पत्रके पाठवली आहेत.अणुयुद्धाच्या वेळी रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आयोडीनच्या गोळ्या घरात ठेवण्याच्या सूचनाही या देशांनी दिल्या आहेत.फिनलंड सरकारने एक ऑनलाइन संदेश जारी केला आहे. देशावर हल्ला झाला तर सरकार काय करणार याबाबत यामध्ये सांगण्यात आले आहे. फिनलंडने आपल्या लोकांना युद्धामुळे वीज कपातीचा सामना करण्यासाठी बॅक-अप वीज पुरवठा ठेवण्यास सांगितले आहे. लोकांना कमी ऊर्जा वापरणाऱ्या किंवा न शिजवता खाऊ शकणाऱ्या अन्नपदार्थांचा साठा ठेवण्यास सांगण्यात आले. स्वीडनने ‘इन केस ऑफ क्रायसिस ऑफ वॉर’ नावाची पुस्तिका जारी केली आहे.ज्यात युद्धाच्या बाबतीत नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. युद्धादरम्यान आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ७२ तासांचे अन्न, पिण्याचे पाणी आणि अत्यावश्यक औषधे, बटाटे, कोबी, गाजर आणि अंडी भरपूर प्रमाणात ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे