पुणे – राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज पुण्यातील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदीबागेला भेट दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आले. त्या अजित पवारांची बहीण नीता पाटील यांच्या भेटीला आल्याचे स्पष्टीकरण अजित पवार गटाकडून देण्यात आले आहे.
सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा मोदीबागेत पोहोचल्या. तब्बल सव्वा तास त्या तिथे होत्या. सुनेत्रा या त्यांच्या नणंदेला भेटायला गेल्याचे सांगितले जात असले तरी त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारही मोदीबागेत उपस्थित असल्याचे समजते. मात्र, मोदीबागेतून बाहेर पडल्यावर पत्रकारांशी न बोलता त्या गाडीत बसून निघून गेल्या. सुनेत्रा या शरद पवार किंवा सुप्रिया यांना भेटल्याला कुणीही दुजोरा दिला नाही. शरद पवार हे कालच मुंबईहून पुण्याला आले होते.
कालच शरद पवार यांची भेट घेणार्या छगन भुजबळ यांना सुनेत्रा पवार मोदीबागेतील भेटीविषयी विचारले असता, शरद पवार हे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्या तर गैर काय आहे? ते एकत्र आले तर चांगले आहे, असे उत्तर त्यांनी दिले.तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, मोदी बाग भेटीबाबत मला काहीही माहिती नाही. त्याबाबत माहिती घेऊन मी बोलेन. ही कौटुंबिक भेटसुद्धा असू शकते. शिवाय शरद पवारांची प्रकृती ठीक नाही.
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनीही तातडीने स्पष्टीकरण देत म्हणाले की, सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या बहिण नीता पाटील यांना भेटायला गेल्या होत्या. त्या मोदीबागेत बी विंगमध्ये पाचव्या मजल्यावर राहतात. त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्या होत्या, असे चव्हाण यांनी सांगितले.