अयोध्या – अयोध्येतील श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (७९) यांचे आज सकाळी निधन झाले. ३ फेब्रुवारीला त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी अयोध्येहून लखनौ पीजीआय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव अयोध्येत आणून त्यांच्या सत्यधाम गोपाळ मंदिर आश्रमात अंतिम दर्शनासाठी ठेवले होते.
२० मे १९४५ ला अयोध्येपासून ९८ किमी अंतरावर असलेल्या संत कबीर नगर जिल्ह्यात सत्येंद्र दास यांचा जन्म झाला होता. गेल्या ३२ वर्षांपासून ते रामजन्मभूमीत मुख्य पुजारी म्हणून काम करत होते. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद विध्वंसाच्या वेळी रामलल्लाच्या मूर्तीला कडेवर उचलून ती सुरक्षित ठेवली होती. आचार्यांच्या निधनाबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी एक्सवर लिहले की प्रभू श्री रामाचे महान भक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आणि आध्यात्मिक जगताचे मोठे नुकसान आहे. विनम्र श्रद्धांजली! प्रभू श्री रामांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे. यासह त्यांच्या शोकाकूल शिष्यांना आणि अनुयायांना दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी.
अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन
