लंडन- अमेरिकेतील अनधिकृत भारतीयांना बेड्या घालून परत पाठवल्यानंतर आता इंग्लंडमधील अनधिकृत भारतीयांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या व्यवसायांवर धाडी टाकण्यात येत आहेत. भारतीयांची हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, ब्युटी पार्लर व कारवॉश सारख्या व्यवसायात अनेक अनधिकृत भारतीय राहतात असा अंदाज आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गृहविभागाने धाडी टाकून त्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.
इंग्लंडच्या गृह विभागाच्या मंत्री अवेट कूपर यांनी म्हटले की, जानेवारीमध्ये अशा प्रकारच्या आस्थापनांवर विक्रमी धाडी टाकल्या आहेत. या महिन्यात 828 आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या असून, गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 48 टक्के अधिक आहे. गेल्या महिन्यात प्रामुख्याने रेस्टॉरण्ट, खाद्यविक्रेते, कॅफे, पेयपान केंद्र व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या दरम्यान 609 जणांना अटक करण्यात आली. हंबरसाईड भागातील एका हॉटेलात मारलेल्या धाडीत एकूण 7 जणांना अटक करण्यात आली असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आमच्या देशाच्या इमिग्रेशन कायद्यांचा योग्य तो सन्मान राखलाच गेला पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे अनधिकृतरित्या येणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ झालेली आहे. अनेकजण छोट्या बोटीतून खाडी पार करून देशात येतात. यात त्यांच्या जीवितालाही धोका असून, आमच्या देशाला व इमिग्रेशन पद्धतीलाही मोठा धोका आहे.
2024 च्या निवडणुकीनंतर देशातील अनधिकृत नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून, त्यांना अटक करण्याच्या प्रमाणात 38 टक्के वाढ झाली आहे. या काळात 16,400 लोकांना परत पाठवण्यात आले आहे. इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 800 लोकांना परत पाठवण्यात आले आहे. यामध्ये चोरी, अंमली पदार्थांची तस्करी, बलात्कार व खुनाचे आरोप असलेल्या गुन्हेगारांचा समावेश होता. हीच कारवाई आताही सुरू आहे. या कारवाईत सापडलेल्या भारतीयांवर काय कारवाई होणार याची चिंता आहे. त्यांना कैदेत टाकतात की, अमेरिकेप्रमाणे त्यांना परत पाठवतात याकडे लक्ष आहे. अमेरिकेने केलेल्या अपमानास्पद कारवाईमुळे भारतात संताप पसरला आहे. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यात हा मुद्दा उपस्थित करतात का, याकडे सर्वांचे लक्ष असतानाच आता इंग्लंडमध्येही अनधिकृत भारतीयांवरील कारवाई अधिक कठोर केली आहे.
गेल्या महिन्याभरात 4 चार्टर्ड विमानांच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करणाऱ्यांना परत पाठविण्यात आले. ब्रिटनमध्ये भारतीयांकडून होत असलेल्या उल्लंघनाच्या विरोधात संसदेतही चर्चा झाली आहे.
अमेरिकेनंतर आता इंग्लंडमध्येही अनधिकृत भारतीयांना पकडणे सुरू
