अमृतसर- अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने लष्करी विमानाने भारतात परत पाठविलेली बेकायदा भारतीय नागरिकांची पहिली तुकडी आज दुपारी पंजाबच्या अमृतसरमध्ये उतरली. या विमानात 104 नागरिक आहेत. त्यात सर्वाधिक संख्या गुजरात आणि हरिय़ाणा या राज्यांच्या रहिवाशांची आहे. या दोन राज्यांतील प्रत्येकी 33 रहिवाशांचा यामध्ये समावेश आहे. त्यापाठोपाठ पंजाबचे 30 रहिवासी , महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी 3 तर चंदिगढचे 2 रहिवासी होते. त्यांची तपासणी करून त्यांना मुक्त केले.
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारल्यानंतर भारतीयांवर करण्यात आलेली अशा प्रकारची ही पहिली कारवाई आहे. यानंतर पुन्हा काही नागरिकांना अशाच पध्दतीने पाठवणार असल्याची चर्चा आहे.
बेकायदा भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेच्या हवाईदलाचे सी 16 विमान टेक्सासमधून काल रवाना झाले होते. या विमानात 205 भारतीय आहेत असे सांगण्यात आले होते.मात्र प्रत्यक्षात आज जेव्हा हे विमान अमृतसरमध्ये उतरले तेव्हा त्यामध्ये 104 प्रवासी आहेत असे सांगितले जात होते. तथापि सरकारकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
काल टेक्सासहून निघालेले हे विमान आज दुपारी 1.55 वाजता अमृतसरच्या श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यावेळी विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे विमान अमेरिकेहून रवाना झाल्याचे अधिकृतपणे कळविण्यात आल्यानंतर विमानतळाचे संचालक, व्यवस्थापनातील उच्चपदस्थ अधिकारी, अमृतसरचे पोलीस आयुक्त आणि औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएफ) अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत विमानतळाच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळाचे कॉर्गो गेट आणि दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर बॅरिकेड उभारले. विमानतळावर विविध राज्यांच्या लोकांना त्यांच्या घरी सुखरुप पाठविण्यासाठी स्वतंत्र काउंटर तयार करण्यात आले होते. विमानतळाबाहेर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी उसळली होती. मात्र पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवाशांशी संवाद साधण्यास मज्जाव केला. प्रत्येकाच्या कागदपत्रांची तपासणी करून ते भारतीय आहेत याची खात्री करून घेत त्यांना सोडण्यात आले. सर्वजण आपापल्या मार्गाने गेले. यानंतर आणखी काहींना अमेरिकेहून असेच परत धाडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून यावेळी या समस्येवर काही तोडगा निघेल अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रत्यार्पणाची टांगती तलवार लटकत असलेल्या भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना अद्याप कायम आहे.’जे योग्य असेल तेच करू’, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले आहे असे ट्रम्प म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा अर्थ भारत अमेरिकेला अनुकूल भूमिका घोईल, असा होऊ शकतो.