वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना नोव्हेंबर २०२० च्या निवडणुकीचे निकाल फिरविण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र राष्ट्राध्यक्षपदावर असताना ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांवर कायदेशीर कारवाई करता येणार नाही,असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे ट्र्म्प यांना दिलासा मिळाला आहे .
याप्रकरणी ट्रम्प यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू होता. ट्रम्प यांनी या विरोधात वॉशिंग्टन येथील कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल केला होता.कनिष्ठ न्यायालयाने ट्रम्प यांचे अपिल फेटाळले होते.
मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने वॉशिंग्टनच्या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला.अमेरिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका माजी राष्ट्राध्यक्षाने सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयांबद्दल फौजदारी खटला चालविला जाऊ शकत नाही,असा निर्णय पहिल्यांदाच दिला आहे .
अमेरिकेत ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांकडून हिसाचार झाला होता. ३ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात बायडेन यांना ३०६ इलेक्टोरल मते मिळाली आणि ट्रम्प यांना २३२ इलेक्टोरल मते मिळाली. निकाल जाहीर होताच ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीत हेराफेरीचे आरोप केले होते.