वॉशिंग्टन- अमेरिकेत आर्थिक मंदी येऊ शकते, असे विधान राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीवेळी केले. त्यामुळे जगभरात भीती पसरली आणि सर्वच देशांत शेअर बाजार अक्षरशः कोसळला. भारताला तुलनेने कमी फटका बसला, पण ऑस्ट्रेलिया, जपान अशा अनेक देशांतील शेअर बाजारात भूकंप होऊन शेअर नीचांकी गडगडले.
अमेरिकेत मंदी येणार या चिंतेने काल अमेरिकेच्या शेअर बाजारात भूकंप होऊन बड्या गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. परिणामी डाऊ जोन्स, एस अँड पी आणि नॅसडॅक या तिन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सरासरी 900 अंकांची मोठी घसरण झाली. नॅसडॅकने सप्टेंबर 2022 पासूनची सर्वाधिक नीचांकी पातळी गाठली. तर डाऊ जोन्स आणि एस अँड पी 500 यांची ही या वर्षातील सर्वात खराब कामगिरी ठरली. 2022 नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे. अमेरिकेतील पडझडीचे थेट पडसाद भारतासह जगभरातील शेअर बाजारांत उमटले. भारतासह जपान, कोरिया, हाँगकाँगच्या शेअर बाजारांमध्ये आज मोठी घसरण झाली. ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजाराने तर आजच्या घसरणीत मागील सात महिन्यांची नीचांकी पातळी गाठली.
रविवारी एका वृत्त वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान देश मंदीच्या उंबरठ्यावर आहे हे खरे आहे का, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे मंदी येणार असे संकेत दिले. मी मंदीचे भाकीत करणार नाही, पण नक्कीच हा बदलाचा काळ आहे. आम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे ते फार मोठे आहे. हा काळ अस्थिरतेचा आहे, असे ट्रम्प म्हणाले. त्याचवेळी बाजाराला आवडो किंवा न आवडो तुम्हाला योग्य तेच करावे लागेल, असे म्हणत ट्रम्प यांनी आयात शुल्कवाढीच्या धोरणाचे समर्थन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मंदी येणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली. परिणामी धास्तावलेल्या बड्या गुंतवणूकदारांनी आपले भांडवल सुरक्षित राखण्यासाठी विक्रीचा धडाका लावला. काल बाजार सुरू होताच डाऊ जोन्स, नॅसडॅक आणि एस अँड पी या तिन्ही
निर्देशांकात घसरण झाली. दुपारी काही वेळासाठी बाजार सावरला, पण दिवसाअखेर बाजार घसरणीसह बंद झाला. डाऊ जोन्स दिवसभराच्या उलाढालीत तब्बल 1100 अंकांनी आपटला होता. मात्र दुपारी काहीसा सावरल्याने दिवसअखेर 890 अंकांच्या म्हणजेच 2.08 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. एस अँड पी 500 मध्ये 2.7 टक्क्यांची तर नॅसडॅक 4 टक्क्यांची घसरण झाली. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर तिन्ही निर्देशांकांमध्ये झालेली ही सर्वात मोठी पडझड ठरली.
सर्वाधिक विक्री तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये झाली. गुगल, युट्युब, फिटबिट आदीची मालक कंपनी असलेली अल्फाबेट, ॲमेझॉन, ॲपल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया आणि टेस्ला या सात सर्वोत्कृष्ट कंपन्यांचे समभाग या पडझडीत गडगडले. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा दर्जा असलेले अब्जाधीश उद्योजक इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे समभाग सोमवारच्या एका दिवसात 15.4 टक्क्यांनी कोसळले. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत टेस्लाचे समभाग 45 टक्क्यांनी घसरले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी – एएसएक्स 200 हा प्रमुख निर्देशांक 1.8 टक्क्यांच्या घसरणीसह 7,890.10 अंकांची पातळी गाठली. ऑगस्ट 2024 नंतरची ही सर्वात मोठी घसरण ठरली. आशियाई बाजारात जपानचा निक्केई 820 अंक, हाँगकाँगचा शेअर बाजार 308 अंक, दक्षिण कोरियाचा शेअर बाजार 2.3 टक्के घसरला. जपानच्या शेअर बाजाराने जुलै 2024 मध्ये 42438 चा सर्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यात 8.03 टक्क्यांची मोठी
घसरण झाली.
भारतीय शेअर बाजार आज उघडताच 400 अंकांनी कोसळला. अमेरिकेतील अनिश्चिततेचा प्रतिकूल परिणाम होऊन मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत सकाळच्या सत्रात मोठी पडझड झाली. मात्र दुपारनंतर बाजार चांगलाच सावरला. निफ्टी 37.60 अंकांनी वाढून 22,497.90 अंकांवर तर सेन्सेक्स 12.85 अंकांनी घसरून 74,102.32 अंकांवर बंद झाला.
अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर! जगभरातील शेअर बाजार गडगडला
