मुंबई – मराठी व हिंदी अभिनय क्षेत्रात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते योगेश महाजन यांचे काल वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती दिली. आज त्यांच्या पार्थिवावर बोरिवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.योगेश महाजन यांनी अनेक मराठी चित्रपट आणि काही हिंदी पौराणिक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी ते उमरगावला गेले होते. १८ जानेवारीला संध्याकाळी योगेश यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतले आणि रात्री ते हॉटेलच्या खोलीत झोपायला गेले. मात्र काल सकाळी ते शूटिंगसाठी सेटवर आले नाहीत.योगेश सेटवर न आल्याने मालिकेच्या टीममधील सदस्यांनी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र योगेश यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांच्या हॉटेल खोलीचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा ते बेडवर झोपलेल्या अवस्थेत आढळले. परंतु, तोपर्यंत हृदयविकाराने त्यांचे निधन झाले होते.
महाजन यांनी मराठी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम केले. मनोरंजन क्षेत्रात काम करण्यापूर्वी ते भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीतून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘मुंबईचे शहाणे’, ‘समसारची माया’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.