मुंबई – मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयासमोर अन्नदान करणाऱ्या एका व्यक्तीने जेवण हवे असल्यास जय श्रीरामचा नारा द्या अशी अट घातल्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे या अन्नदात्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परळच्या कर्करोग रुग्णालयामध्ये देशभरातून अनेकजण उपचारासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी विविध संस्था, संघटनांच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान केले जाते. कालही अशाच प्रकारे एक व्यक्ती अन्नदान करत होता. त्याच्यासमोरील रांगेत एक मुस्लिम महिलाही उभी होती. तिला त्याने जेवण हवे असल्यास जय श्रीराम बोलावे लागेल असे सांगितले. त्याला नकार दिल्यावर या दोघांमध्ये वाद झाला. हिंदू नसलात तरी जय श्रीराम बोलण्यात काहीही हरकत नाही असे काहींनी म्हटले. काहीजणांनी मात्र या प्रकाराला तीव्र आक्षेप घेतला. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांसाठी अन्नदान केले जात असते. सामाजिक जाणीव व मानवतेच्या दृष्टीने हे अन्नदान केले जाते. मात्र अन्नदानाचाही प्रचारासाठी असा प्रयत्न कधीही झालेला नाही. अशा प्रकारच्या सक्तीमुळे या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. असे प्रकार करुन कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी समज या नोटीशीतून देण्यात आली आहे.