मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सडकून टीका केली. देशमुख यांना जिवे मारण्याचा हा कट होता, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
देशमुख यांच्यावर झालेला हल्ला चिंता वाढविणारा आहे. राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण त्यांच्याच नागपूरमध्ये एका माजी गृहमंत्र्यांवर हल्ला होतो, ही बाब चिंताजनक आहे. देशमुख यांना जिवे मारण्याचाच हा कट होता. हल्लेखोर भाजपा जिंदाबाद अशा घोषणा देत होते, असा आरोप राऊत यांनी केला.
भाजपावाले या घटनेला स्टंट म्हणून हिणवतात. त्यांना सांगावेसे वाटते की स्टंटबाजी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मक्तेदारी आहे. त्यांच्याकडून स्टंटबाजी शिकण्याची आम्हाला गरज नाही. येत्या एक दोन दिवसांत आणखी अनेकांवर असेच हल्ले होतील याची चिंता वाटते,असे राऊत म्हणाले.