बीड- राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी ३० जानेवारीला बीड दौऱ्यावर आहेत . बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिला दौरा असणार आहे. या वेळी अजित पवारांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांतील प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक विभागाची प्रलंबित योजना, त्यातील अडचणी, आणि प्रगतीवर चर्चा केली जाईल.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण आणि त्यावर होणाऱ्या राजकीय चर्चांमुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे. या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला वेग आला असून, भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासावर गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता अजित पवार बीड दौऱ्यावर असल्यामुळे ते या पार्श्वभूमीवर बोलतील आणि आढावा बैठकीत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे