पालघर – अजमेरहून मुंबईकडे परत येतांना काल रात्री २ वाजताच्या सुमारास गुजरातमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पालघरच्या ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेले ४ तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काल रात्री पालघर येथे राहणारे एकाच कुटुंबातील सात जण अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शन घेऊन परत येत होते. गुजरातच्या भरूच अंकलेश्वर परिसरातील बाकरोल ब्रीज जवळ त्यांची आर्टिगा गाडी व ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला. अपघातात आयान चोगले, ताहीर शेख आणि मुदस्सर पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. सलमान शेख, शाहरुख शेख, शादाब शेख आणि मोईन शेख हे ४ तरुण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक व पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले होते. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींचा बचाव केला.