मुंबई – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने इंडिया आघाडीला आता इतके तडे जाऊ लागले आहेत की, ही आघाडी संपुष्टात येणार हे निश्चित झाले आहे. याच आघाडीचे घटक असलेले मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेसही उघडपणे एकमेकांवर वार करीत आहेत. त्यातच संजय राऊत यांनी फडणवीस यांचे कौतुक सुरू केले आहे.
मविआतील तीन प्रमुख घटक पक्षांनी एकमेकांवर लाथाळ्या झाडल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी काल राष्ट्रवादीच्या बैठकीत उबाठा आणि काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली आणि मविआमध्ये ठिणगी पडली. कोल्हे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, जागावाटपाचा घोळ 20 दिवस लांबल्याने फटका बसला तर राऊत यांनी पराभवाला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार असल्याचा पलटवार करताना नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन दिवसीय बैठकीच्या कालच्या दुसर्या दिवशी अमोल कोल्हे यांनी विधानसभेतील पराभवाचे विश्लेषण करताना काँग्रेस आणि उबाठावर बोचरी टीका केली. राज्यातील सद्यस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंची शिवसेना झोपेतून जागी व्हायला तयार नाही. तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. हे पक्ष अद्याप पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पण आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखा लढणारा नेता आहे. विरोधी पक्षात मोकळी पोकळी आपल्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असे म्हणत आपण पुढे गेले पाहिजे, अशा आशयाचे वक्तव्य कोल्हे यांनी केले होते.
कोल्हे यांच्या या वक्तव्याबद्दल मीडियाने आज छेडले असता काँग्रेसचे वडेट्टीवार यांनी आपल्या मनातील खदखद उघडपणे बोलून दाखविली. ‘मविआच्या जागावाटपाची चर्चा मुख्यतः नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात होत होती. एका जागेसाठी वारंवार त्याच त्याच मुद्यावर चर्चा होत होती.
जागावाटपाच्या चर्चेत मीही होतोच. पण बैठकांना काही नेते उशिरा येत होते. सकाळी अकरा वाजताच्या बैठकीला काही नेते दुपारी दोन वाजता यायचे. त्यामुळे जागावाटपाला विनाकारण विलंब झाला. हा विलंब हेतूपुरस्सर होता का, ते एक षड्यंत्र होते का,असा संशय माझ्या मनात येतो. जागावाटपाचे निर्णय समन्वयाने झाले असते तर दोन दिवसांत चित्र स्पष्ट झाले असते. त्यामुळे 18 दिवस आम्हाला प्रचार करण्यासाठी मिळाले असते. पण जागावाटपाची बोलणी वीस दिवस लांबली. त्यामुळे आम्हाला प्रचार करायला, प्रचाराचे नियोजन करायला वेळच मिळाला नाही. त्याचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला, असे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर पलटवार करताना राऊत यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी काँग्रेसवर टाकली. जागावाटपात काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही, असा थेट आरोप करत राऊत यांनी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्याबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेला विजय हा वेगळा विषय आहे. त्या विजयामुळे सत्ताधारी पक्ष सावध झाला. विधानसभेत त्याचा परिणाम स्पष्ट दिसला. या पराभवाला आम्ही सगळेच जबाबदार आहोत. पण मुख्य जबाबदारी ही काँग्रेसवरच होती. काँग्रेसला ती निभावता आली नाही. कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही मागत होतो. ती जागा आम्ही सहा वेळा जिंकली होती. ती जागा आम्हाला मिळाली असती तर आम्ही जिंकलो असतो.अशा अनेक जागा आहेत की ज्या जागांवर समन्वयाने निर्णय घेता आला नाही.प्रत्येक घटक पक्षाला आपापल्या जागा हव्या होत्या. पण त्या चर्चा सकारात्मक होऊ शकल्या नाहीत. महाराष्ट्रासारखे राज्य आमच्या हातून जाणे ही राज्यासाठी दुर्घटना आहे, असे राऊत म्हणाले. काही लोकांना मुख्यमंत्री व्हायचे होते त्यासाठी त्यांना जास्त जागा हव्या होत्या, असे म्हणत नाव न घेता राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना टोला हाणला.
देशपातळीवर इंडिया आघाडीत निर्माण झालेल्या परिस्थिवर बोलताना राऊत म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबद्दल जे परखड मत मांडले त्या मताशी मी सहमत आहे. लोकसभेची निवडणूक आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने लढलो आणि बर्यापैकी यशस्वी झालो. त्यानंतर ही एकजूट टिकवून ठेवण्याची आम्हा सर्वांची आणि आघाडीतील सर्वात मोठा पक्ष या नात्याने काँग्रेसची जबाबदारी होती. निवडणुकीनंतर पुन्हा आम्ही एकत्र बसून चर्चा करायला हवी होती. पुढची वाटचाल कशी असावी याचे मार्गदर्शन काँग्रेस करायला हवे होते. विविध मुद्यांवर घटक पक्षांची भूमिका काँग्रेसने समजून घ्यायला हवी होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आजपर्यंत इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नाही. हे इंडिया आघाडीसाठी मारक आहे. ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासारखे नेते इंडिया आघाडी विसर्जित करण्याची भाषा बोलू लागले आहेत. आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अशी भावना निर्माण होत असेल तर त्याची जबाबदारी सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचीच आहे.
आता जर का इंडिया आघाडी फुटली तर भविष्यात कधीही अशा प्रकारे आघाडी उभी करता येणार नाही, असा गंभीर इशाराही राऊत यांनी काँग्रेसला उद्देशून दिला.