*तापमानाचा पारा
४० अंशांवर पोहचणार
नागपूर- राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र दिसत आहे.परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावे लागत आहे. विदर्भात अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उद्या १२ मार्च आणि परवा १३ मार्च रोजी उष्णतेची लाट येणार असून पारा ४० अंशांवर पोहचणार आहे,अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिली.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,सध्या विदर्भातील सर्वच जिल्ह्याचा पारा ३७ डिग्रीच्या पार पोहचला आहे. आजपासून पुढच्या दोन तीन दिवसात चंद्रपूर,अकोल्याचे तापमान ४० अंश पार जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तर यंदा सामान्य तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने पारा चढणार आहे.मार्च महिन्यात विदर्भातील तापमान साधारणपणे ३६ डिग्रीपर्यंत असते. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठला आहे. परिणामी हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
दुसरीकडे,नंदूरबारमध्ये ३९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.तर पुण्यातदेखील तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचले आहे. पुण्यात काल सोमवारी ३६.९अंशांची नोंद करण्यात आली आहे.पुण्यातील कोरेगाव पार्कात सर्वाधिक ३९.६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. विदर्भातील अकोल्यात तापमान ३८.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे