मुंबई- अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुणांत मोठी घट झाली आहे.
यामध्ये कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ४ ते ५ टक्क्यांची घट झाली आहे. पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांमध्ये नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण म्हणजे कटऑफ नव्वदीपार गेले होते. दुसऱ्या विशेष फेरीसाठी अकरावीच्या विविध महाविद्यालयांतील १ लाख ३४ हजार ९१२ जागांसाठी ३५ हजार २८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले, तर ७ हजार ३८९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतिक्षा आहे. १८ हजार ७०३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, ३ हजार ६४५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि १ हजार ८७७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे.